पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. तसेच नवी मुंबईतील एका इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत.
१५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी सुमारे १० वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत (INS Surat), आय एन एस निलगिरी (INS Nilgiri) व आय एन एस वाघशीर (INS Vaghshir) या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील .
तीन युद्धनौकांमध्ये काय आहे खास?
तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप असणार आहे. आयएनएस सूरत, P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे. आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून, पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.
इस्कॉन मंदिराचेही होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्या दरम्यान उद्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this