रात्री साडेआठच्या दरम्यान मला एक फोन आला की वकिली शिकणारा एक विद्यार्थी घरातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी पकडलं आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यावेळेस मला फोन आला त्यादरम्यान परभणी मध्ये भीम नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत होते.सोशल मीडियावर काम करणाऱ्या एका तरुणाचा आज सकाळी फोन आला ‘मला पकडले, घोषणा देत होतो शिक्षणाच अवघड होईल’ तो बोलत होता आणि या प्रकरणाचे गंभीर स्वरूप कसे असू शकते हे मला दिसत होतं.
भारतीय संविधानावर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची भूमिका या विषयांवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भरपूर चर्चा झाली. हातामध्ये संविधान घेऊन शपथ घेणारे आणि संविधान रक्षणासाठीच लोकांनी आम्हाला बहुमताने निवडून दिलेले आहे अशा अविर्भावात वावरणारे सर्वच प्रस्थापित पक्ष आपण पाहिले आहेत. परंतु परभणीमध्ये संविधानाचा अपमान व विटंबना करणारा प्रकार घडल्यानंतर किमान हे प्रस्थापित वर्गातील बेगडी संविधानावर प्रेम दाखवणारी मंडळी संविधान रक्षण आणि सन्मानासाठी पुढे येतील असं वाटलं होतं ते काही प्राथमिक स्वरूपातील सोडले तर बाकी संविधान रक्षणाचे काम हे भीम नगर व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीच करावं लागतं. हे स्पष्टपणान समोर येते.
दंगेखोर यांना अटक केलेली आहे त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड तपासले जाईल, आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले, प्रामुख्याने प्रसारमाध्यमांमध्ये आणि प्रशासनाकडून प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रिया गंभीर स्वरूपाच्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून संविधान अवमानाचा मुद्दा बाजूला राहून मोर्चे आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे, असंच पुढे येत होतं. भारतीय संविधानाच रक्षण करणे प्रश्न हा आहे, ही आंबेडकरी चळवळीतीलच जनतेचीच फक्त जबाबदारी आहे का? ज्यांनी ह्या संविधानाच्या प्रतीचा अवमान केला, तो ज्या समाजाचा आहे त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं नाही का? मात्र अपेक्षित होतं की तमाम जनतेने यासंदर्भामध्ये संविधान सन्मानाची भूमिका घ्यावी.
निश्चितपणानं आंबेडकरी जनता ही भारतरत्न दिग्विजयी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या आपल्या अस्मितेच्या विषयावर प्राणपणानं लढण्यासाठी तयार असते परंतु या पद्धतीच्या भावना लक्षात घेऊन कोणी याचं राजकारण करतय का? हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. संविधानाच्या प्रतिमेची विटंबना आणि कुश्चितपणे त्याची तोडफोड करणं हे काम करणारी वृत्ती आणि त्याच्या पाठीमागे असणारी षडयंत्र करणारी मानसिकता कोणी वेगळी आहे का? या आंबेडकरी जनतेने अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहावं हे कोणाला वाटतंय का? हे ही तपासण आवश्यक आहे.
आंबेडकरी जनतेला नम्र आवाहन आणि निवेदन मला करावसं वाटत की, राजकीय परिघावर मोठ्या प्रमाणात या समुदायाची पीछेहाट होत आहे, आंबेडकरी लढाऊ नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये यश येताना दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अस्मितेचे ज्या पद्धतीने कोणी राजकारण आणि अपमान करत असेल तर त्याच्या विरोधात ज्या पद्धतीने आंबेडकरी समुदाय रस्त्यावर येतो, त्याच जनतेने मतपेटीतून आंबेडकरी लढाऊ नेत्यांना व अनुयायांना विधानसभा आणि लोकसभे मध्ये पाठवायची आवश्यकता आहे. रस्त्यावर होणारा उद्रेक आणि आक्रोश संविधानिक मार्गाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये घुमल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचा सन्मान होणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे लोकशाही राबवली जाणार नाही. आंदोलनासाठी असणारा प्रचंड भीमसागर मतदान करण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना संसदीय राजकारणात पाठवण्यासाठी मतदानाच्या बुथवर रांगाच्या रांगा उभ्या केल्याशिवाय हे साध्य होणार नाही.
विधानसभा निवडणुकीच्या नंतर या पद्धतीची घटना घडणं ही खऱ्या अर्थाने शासनकर्त्या व्यवस्थेला एक मोठा आव्हान आहे, नेमकेपणानं अशा घटना कौशल्याने हाताळणं आवश्यक आहे. शासनकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा घटना ह्या संविधानाची जी चौकट तयार आहे ती मोडकळीस आणल्याशिवाय राहणार नाहीत त्याचे गंभीर परिणामही दिसायला लागतील. नाहीतर सामाजिक दरी आणि संविधानाच्या अनुषंगाने रक्षणाची भूमिका घेत असणाऱ्या अनुयायांना हिंसक व दंगेखोर म्हणून घोषित केले जाईल. निश्चितपणानं आंबेडकरी समुदायाच्या कडून काही घटना घडलेल्या असतील मात्र त्या कोणत्या पार्श्वभूमीवर घडल्या अशा पद्धतीचा संविधानाच्या अवमान करणाऱ्या प्रवृत्ती कार्यरत असतील तर त्याच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाकडे सहानुभूतीपूर्वक पहावे लागेल. प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुद्धा अशाच अर्थाच्या प्रतिक्रिया आल्या, त्या गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. निश्चितपणानं अन्यायाच्या विरोधात व भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणारा मोठा वर्ग आंबेडकरी आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आपणास आहे. मात्र फक्त रस्त्यावरच्या हिंसक आंदोलनाने फक्त हे प्रश्न सुटणार नाहीत तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून संसदीय राजकारणामध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी गेल्याशिवाय या पद्धतीच्या प्रश्नाचं समुळ उच्चाटन करता येणार नाही. आंदोलन करण्यासाठी उसळलेला भीमसागर निवडणुकीच्या मध्ये आपल्या खऱ्या प्रतिनिधींना निवडून देण्यासाठी मतदानाच्या रांगेत उभा राहून खऱ्या प्रतिनिधींना निवडून देऊ शकला तर संघर्षाबरोबर रचनात्मक आणि संविधानिक दृष्ट्या आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. जर आपण असं करू शकलो नाही तर संविधान रक्षकांना आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना संविधान रक्षक व सामाजिक न्यायाचा संघर्ष करणारा समुदाय म्हणून न पाहता प्रस्थापित समाजव्यवस्था दंगेखोर असं घोषित करेल आणि त्यांच्या मनामध्ये असणारे हेतू आणि राजकारण ते सफल करतील.
भीमनगर मधल्या आंबेडकरी अनुयायांना संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप व संविधानावर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या संविधान रक्षकांना प्रस्थापित समाज व्यवस्था दंगेखोर आणि क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे तपासणीच्या नादात त्यांचं करिअर व त्यांच्या भीमनगर सारख्या आंबेडकरी अनुयायांच्या वस्त्या कोंबिंग ऑपरेशनचा अड्डा बनवून चुकीचे संकेत देताना प्रशासन दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेलं आंदोलन तसेच रमाबाई आंबेडकर नगर येथील निष्पाप लोकांचे गेलेले बळी व झालेले कोंबिंग ऑपरेशन, भीमा कोरेगाव येथील दंगल व आता परभणीत होत असलेला आंदोलन हे हाताळत असताना प्रशासन खास करून पोलिसी यंत्रणा सारखेच वर्तन करत आहे का? हे ही तपासलं पाहिजे. भारतीय संविधानाचा हवाला देत नुकतेच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनीही येणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये काय भूमिका घेतील हे ही आपण पाहिलं पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर संविधानाचा सन्मान करण्याविषयी संविधानाचा अमृत महोत्सवी ७५ वर्षे होत असताना कोणत्या स्वरूपामध्ये आपण पुढे चाललो आहे, याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे.
प्रवीण मोरे
रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता,
१२ डिसेंबर २०२४,
खारघर, नवी मुंबई
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this