Blog ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच

नवी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष एकत्र येऊन लढतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असतानाच, नवी मुंबईत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेनेत दिलजमाई करणे शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्य होईल का ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुका एकत्रपणे लढण्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत.

ठाण्यातील आनंद आश्रम येथे वेगवेगळ्या पक्षातील कायर्कर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी विधानसभेपाठोपाठ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणूनच लढवण्यात येतील, अशी घोषणा केली. राज्यातील जनतेने आणि विशेषत: लाडक्या बहिणींनी महायुतीतील तीनही पक्षांना भरभरून साथ दिल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. यामुळे महायुती म्हणुन निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले. शिंदे यांच्या आवाहनामुळे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट संदेश गेला असला, तरी त्यांची ही भूमिका नवी मुंबईत प्रत्यक्षात उतरेल का याविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत.

नवी मुंबईत विळ्या-भोपळ्याचे नाते

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पोलीस दलात ठाण्याचा हस्तक्षेप वाढला असल्याची टीका स्वत: गणेश नाईक आणि समर्थकांनीही केली आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील मोक्याचे भूखंड चुकीच्या पद्धतीने वाटप होत असल्याचा आरोपही नाईक यांच्या गोटातून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचे नवी मुंबईतील कडवे समर्थक आणि गणेश नाईक यांच्या गटात नेहमीच विळ्या भोपळ्याचे नाते राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात नाईक यांच्याविरोधात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी केली. तर बेलापूर मतदारसंघात विजय नाहटा रिंगणात उतरले. बेलापूर मतदारसंघात नाईक यांचे पुत्र संदीप यांच्या पराभवासाठी स्वत: एकनाथ शिंदे प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे यांनी केलेल्या आवाहनामुळे विजय नाहटा यांच्याकडे जाणारा महायुतीचा मतांचा ओघ आटला आणि शिंदेसेनेतील बहुसंख्या कार्यकर्त्यांनी मंदा म्हात्रे यांच्या पारड्यात मतदान केले. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोन राजकीय नेत्यांमध्ये मंत्रिमंडळात जरी सुसंवाद निर्माण झाला तरी नवी मुंबईच्या राजकारणात या दोन पक्षांचे नेते एकत्र येणे कठीण आहे.

भाजपमध्येच मतभेद

महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वनमंत्री गणेश नाईक आणि पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वितुष्टाचा सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही नेते आपआपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील अशी शक्यता आहे. असे असताना ही निवडणूक लढण्यासाठी स्वत: गणेश नाईक कितपत तयार होतील हा प्रश्न आहे. तसेच विधानसभा निवडणुकांपुर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या २४ माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे आव्हान नाईक यांच्यापुढे असणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदे यांना महायुतीचा प्रस्ताव पुढे ठेवला तरी स्थानिक पातळीवरील विसंवादामुळे तो मान्य होईल का हा प्रश्न कायम आहे. दरम्यान, या मुद्द्यांवर बोलण्यासाठी नवी मुंबई भाजप नगराध्यक्ष रामचंद्र घरत यांनी नकार दिला.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video