Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश

बदलापूरः शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत अनावधानाने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई झाली. मात्र यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. तसेच त्यांचे जप्त साहित्यही त्यांना परत केले जाईल, असे आश्वासन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिले आहे. प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयात मुख्याधिकारी गायकवाड यांची भेट घेतली. वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यासाठीचा आदेश काढण्याची मागणीही यावेळी सदस्यांनी केली. त्यावरही लवकरच निर्णय घेऊ असेही गायकवाड म्हणाले. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी या आठवड्यात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.

सोमवारी बदलापूर पूर्वेतील काही भागात कारवाई केल्यानंतर बुधवारी बदलापूर पश्चिमेतील स्थानक परिसर, बाजारपेठ भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई शहरात महापालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले होते. पुढे ठाणे महापालिकेनेही अशाच प्रकारे वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात आले होते. मात्र बदलापुरात कारवाई का असा प्रश्न वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित केला. या कारवाईनंतर प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी सकाळी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांची भेट घेतली.

यावेळी चर्चेवेळी वृत्तपत्र विक्रेत्यांवरच्या कारवाईबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना यापुढे अशी कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांना दिली. तसेच बुधवारच्या कारवाईत ज्यांचे साहित्य जप्त झाले आहे त्यांना ते परत करू आणि यापुढे काळजी घेऊ असेही आश्वासन दिले. बदलापूर शहरात वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देणारे आदेश द्यावेत अशीही मागणी प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या वतीने करण्यात आली. तर याबाबत तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेऊ असेही आश्वासन गायकवाड यांनी दिले. त्यामुळे शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी प्रेस क्लब ऑफ बदलापुरचे अध्यक्ष विजय पंचमुख, सचिव संजय साळूंके आणि इतर सहकारी उपस्थित होते.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video