आबलोली (संदेश कदम)
कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीने देण्यात येणारा “शाहिरी प्रेरणा पुरस्कार २०२५” शाहीर शाहिद खेरटकर यांना इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ आणि रोख रक्कम १००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.कोकणची समृद्ध लोककला जाखडी, कलगी- तुरा गेली पंचवीस वर्षे शाहीर शाहिद खेरटकर जोपासत आहेत.आपल्या लेखणीतून,गायनातून आणि प्रभावी वकृत्त्वाच्या माध्यमातून शाहिरांनी आपली छाप रसिक मनावर सोडली आहे.
https://www.youtube.com/sanvidhanvarta
शाहिद खेरटकर यांच्या लेखणीतून निर्माण झालेली गीते रसिकांना प्रभावित करतात.एक सामाजिक भान असलेला प्रबोधनकार शाहीर म्हणून त्यांचा लौकिक आहे.गेल्या पंचवीस वर्षात शाहिरांनी कोकणातील गावागावात,वाडीवस्तीवर तसेच मुंबई पुण्याच्या रंगमंचावर असंख्य कार्यक्रम केले आहेत.त्यांच्या सादरीकरणातून सामाजिक एकात्मतेचा संदेश द्यायला ते विसरत नाहीत.मुळात समतावादी शाहीर अशी त्यांची ओळख आहे.जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे गीत गाणारा शाहीर म्हणून ते प्रचलित आहेत.शाहिद खेरटकर यांच्या लोककलेतील एकूण योगदानाची दखल घेऊन कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला “शाहिरी प्रेरणा पुरस्कार” प्राप्त करण्याचा पहिला मान शाहिद खेरटकर यांच्या पदरात पडला.याआधीही शाहिद खेरटकर यांना शाहिरी रत्न,कलारत्न,काव्यरत्न,सह्याद्री रत्न,समता भूषण पुरस्कार,मराठा भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्रभरातील विविध संस्थानी सन्मानित केले आहे.कलाविश्वात त्यांनी निर्माण केलेले स्थान कौतुकास्पद आहे.एक उत्कृष्ट शाहीर ,एक कवी,निवेदक, वक्ता आणि पत्रकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे.शाहिरी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण,गुहागर मनसे अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी,कलगी तुरा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. अभयदादा सहस्रबुद्धे व सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ शाहीर दत्ताराम आयरे आदी मान्यवर आणि असंख्य कलाप्रेमी उपस्थित होते.शाहीर शाहिद खेरटकर यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this