Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. सीआयडीचं तपास पथक सध्या त्याची चौकशी करत आहे. वाल्मिक कराडवर खूनाच्या प्रयत्नासह खंडणी, मारहाणीचेही अनेक खटले चालू आहेत. दरम्यान, आता त्याच्या मुलावरही आरोप होत आहेत. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्यायाचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. पीडित कुटुंबाचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी सांगितलं की “सुशील कराडने माझ्या आशिलाच्या घरात घुसून पैसे व सोन्याची लूट केली. तसेच दोन ट्रक, दोन गाड्या, एक भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने माझ्या आशिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे”.

वकील सूर्यवंशी म्हणाले, “वाल्मिक कराड याच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे. सुशीलने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदूकीचा (रिव्हॉल्वर) धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट व सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे व गोपी गंजेवार यांच्याविरुधातही ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मॅनेजरच्या घरी लूट करताना हे दोघे त्याच्याबरोबर होते.

मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर पोलीस आयुक्त व बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

१३ जानेवारी रोजी सुनावणी होणार

अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी म्हणाले, “पोलिसांनी माझ्या आशिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून १३ जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे”. सुशील कराडवर केलेल्या आरोपांबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
Choose Image
Choose Video