June 30, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई

ठाणे : शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विकासकांना नियम आखून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ०७ विकासकांना काम थांबविण्याचे आदेश महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली. प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यावर या विकासकांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे तसेच त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. त्यासंदर्भात, सर्व बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या पाहणीत ज्यांनी नियमावलीचे पालन केलेले नाही अशा बांधकाम स्थळांचा अहवाल प्राप्त झाल्यावर १४ ते १६ जानेवारी या काळात विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटीसा शहर विकास विभागाने बजावल्या होत्या, अशी माहिती महापालिकेमार्फत देण्यात आली.

या विकासकांवर कारवाई

नौपाडा येथील मे. स्कायलाईन इन्फ्रा, ठाणे येथील सुयश पाटणकर, माजिवडा येथील मे. अष्टविनायक एंटरप्रायझेस, सेवा रस्ता येथील मे. पद्मनाभ डेव्हल्पर्स, पारसिक येथील मे. सरस्वती एंटरप्रायझेस, पारसिक येथील मे. जय प्रॉपर्टीज आणि कळवा येथील मे. सिद्धीविनायक डेव्हल्पर्स या बांधकाम विकासकांना थांबवण्याची नोटीस दिल्या आहेत. काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केल्याचे निवेदन शहर विकास विभागास प्राप्त झाले आहे. त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच, यापुढेही कोणाकडून नियमावलीचे पालन झाले नाही तर, अशाप्रकारे कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *