Sanvidhanvarta Blog Blog कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील चिराग हाॅटेल समोरील रस्त्यावर शुक्रवारी रात्री एका मद्यधुंद मोटार कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या वाहन चालकाने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा दुचाकींना जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही.

मोटारीसह दुचाकींचे वाहनाच्या धडकेत नुकसान झाले आहे. चिराग हाॅटेल समोरील रस्त्यावरून एका मोटार कार चालक सुसाट वेगाने चालला होता. या मोटार कार चालकाचे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा दुचाकींना जोराची धडक दिली. धडक झाली त्यावेळी मोठा आवाज झाल्याने या रस्त्याच्या परिसरातील पादचारी आणि दुकानदार इतस्ता पळाले. या भागातील सोसायट्यांमधील रहिवासी रस्त्यावर उतरले.

या वाहनाची धडक होत असताना सुदैवाने तेथे कोणी नव्हते. अन्यथा जीवित हानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शंनी सांगितले. मोटारीच्या धडकेनंतर जागरूक पादचाऱ्यांनी एकत्रित येऊन मोटार कार चालकाला रोखून धरले. बाजारपेठ पोलिसांना तातडीने ही माहिती देण्यात आली. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार घटनास्थळी आले. मोटार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्यांना वाहनातून खाली उतरवले. चालकाने पोलिसांना आपले नाव अनिल तिवारी सांगितले. पोलिसांंनी त्याची तपासणी केली असता त्याने मद्य सेवन केले असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याचे दृश्यध्वनीचित्रण केले

पोलिसांनी या मोटार चालकाला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यांनी मद्यसेवन केले असल्याचे तपासात उघड झाले. हा मोटार चालक सदरा न घालता बनियन घालून वाहन चालवत होता. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी अनिल तिवारी यांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले. मद्यधुंद अवस्थेत तिवारी यांनी वाहन चालविल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शहरात मद्यधुंद, नशेखोर, गांजा तस्कर यांच्या विरुध्द जोरदार मोहीम उघडली आहे. हे माहिती असुनही काही सुस्थितीत घरातील नागरिक मद्य सेवन करून वाहन चालवित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वाहन चालकावर मोटार वाहन कायद्याने दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version