Sanvidhanvarta Blog Blog डोंबिवलीत सुभाष रस्ता भागात दूषित पाणीपुरवठा, गटारांची खोदाई करताना जलवाहिन्या तुटल्या
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवलीत सुभाष रस्ता भागात दूषित पाणीपुरवठा, गटारांची खोदाई करताना जलवाहिन्या तुटल्या

डोंबिवली – येथील पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील क्रांती व्यापारी संकुल, नवापाडा, सुभाष रस्ता ते चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा भागात काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने याविषयी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्ता, नवापाडा ते कुंभारखाण पाडा, चिंचोड्याचा पाडा भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना पत्र देऊन दूषित पाणी पुरवठ्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. सुभाष रस्ता भागात एमएमआरडीएकडून दुतर्फा गटार बांधणीची कामे सुरू आहेत. या भागात लवकरच सीमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची बांधणी केली जाणार आहे. एमएमआरडीएकडून या भागात प्रथम गटार बांधणीची कामे केली जात आहेत. गटारांची खोदाई करताना अनेक ठिकाणी जेसीबाच्या घावाने घरांमध्ये, सोसायट्यांंना गेलेल्या जलवाहिन्या तुटल्या आहेत. या जलवाहिन्या गटारांलगत आहेत. गटारातील सांडपाण्याचा पाण्याचा प्रवाह वाढला की ते पाणी थेट जलवाहिनीत शिरते. हे दूषित पाणी घरांमध्ये पोहचते, असे तक्रारदार प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले.

विश्वंभर दर्शन, यशराज, सुदामा, घनश्याम, मातृप्रेरणा, उमाकांत निवास, कुलकर्णी सदन, निळकंठ अशा अनेक सोसायट्या, बंगल्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिऊन आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. गटारांची कामे करताना होणाऱ्या खोदाईचे काम ठेकेदाराने योग्यरितीने करावे यासाठी त्यांना तंबी देण्यात यावी, अशी मागणी प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे. विकास कामांना आमचा विरोध नाही, पण ही कामे करताना नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. अन्यथा आंदोलनाचा पर्याय खुला आहे, असा इशारा म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.

डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्ता भागात एमएमआरडीएकडून गटार बांधणीची कामे सुरू आहेत. ही कामे करताना काही ठिकाणी खोदकाम करताना जलवाहिन्या फुटल्या आहेत. जलवाहिन्या फुटल्याच्या तक्रारी प्राप्त होताच त्या सुस्थितीत करून दिल्या जात आहेत. आता स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना होत आहे. तरीही नागरिकांची दूषित पाण्याची तक्रार प्राप्त होताच तेथे तातडीने जाऊन तेथील जलवाहिनीची पाहणी आणि ती वाहिनी सुस्थितीत करून देण्याचे काम केले जाते. – उदय सूर्यवंशी, उपअभियंता, ह प्रभाग, पाणी पुरवठा.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version