ग्रामपंचायतीचा बॅनर वापरून कंपनीची दिशाभूल
आबलोली (संदेश कदम)
गावाच्या विकासासाठी सीआरएस निधी मिळावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एका कंपनीकडे अधिकृत पत्र पाठविले होते. या पत्राचा विचार करून कंपनीने ग्रामपंचायतीला मदत करण्याच्या उद्देशाने सीआरएस निधीतून गावासाठी पथदिवे मंजूर केले.
मात्र, हे दिवे ग्रामपंचायतीकडे न देता गावातील दोन व्यक्तींनी परस्पर ताब्यात घेऊन गावात मनमानी पद्धतीने बसवले. एवढ्यावरच न थांबता, सदर व्यक्तींनी ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही असा खोटा दावा करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना घरी बोलावून आभार समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमात “ग्रामपंचायतीच्या वतीने आभार” असे खोटे बॅनर लावून कंपनीची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात आली असून ग्रामपंचायतीची सुद्धा फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महिनाभरापूर्वी गावातील विजय कळंबाटे व बाळकृष्ण कांबळे या दोघांनी तळवली ग्रामपंचातीला एका कंपनीकडून आपल्या ग्रामपंचायतीला पथदिवे मिळणार आहेत ; मात्र त्यांना ग्रामपंचायतीचे मागणीपत्र हवे असल्याचे सांगितले. त्यानुसार ग्रामपंचायतीने ‘विरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रा. लि. (बोरिवली, मुंबई) या कंपनीला देण्यासाठी त्यांच्याकडे पत्र दिले. यानंतर काही दिवसांनी या दोन व्यक्तींनी गावामध्ये पथदिवे बसविण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी विचारणा केली असता आम्ही दिवे आणले आहेत, याच्याशी ग्रामपंचायतीचा काहीही संबंध नाही असे सांगितले. मात्र त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात बसविलेले दिवे पाहण्यासाठी भेट दिली यावेळी या अधिकाऱ्यांचा स्वागताचा कार्यक्रम एका घरामध्ये घेण्यात आला आणि त्यावेळी कंपनीला दाखविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागताचा बॅनर लावण्यात आला. तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच व एक सदस्य यांना बोलावण्यात आले. या कार्यक्रमाचे उपसरपंचांनी स्टेटस ठेवले आणि यांचे पितळ उघडे पडले. याविषयी ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर ग्रामपंचायतीचा बॅनर वापरून कंपनीची दिशाभूल करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या नावाने मंजूर झालेल्या सीआरएस निधीतील दिव्यांचा असा अपहार आणि वैयक्तिक फायद्यासाठी केलेला गैरवापर हा गंभीर प्रकार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी या दोघांनाही ग्रामसभेमध्ये उभे करून सरपंचांनी व ग्रामस्थांनी जाब विचारला असता त्यांची बोबडी वळली. तसेच कार्यक्रमाला गेलेल्या दोन सदस्यांनीही आम्हाला याची कल्पना नव्हती आम्ही त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम समजून गेलो. आमचीही फसवणूक करण्यात आली असल्याचे सांगून कार्यक्रमाला गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
याविरोधात काही अर्ज देखील ग्रामपंचायतीकडे आले होते. सार्वजनिक निधीचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणे ही सरळसरळ फसवणूक व विश्वासघातकी कृत्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
ग्रामपंचायतीच्या नावाने कंपनीकडून मिळालेल्या सीआरएस निधीचा अपहार करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर, प्रशासकीय कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये केली आहे. तसेच याची माहिती संबंधित कंपनीला देण्यात यावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र यावर ग्रामपंचायत कोणता निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. याबाबतीत सरपंचांशी संपर्क साधला असता ही वस्तुस्थिती खरी आहे त्या माणसांनी ग्रामपंचायतीची फसवणूक केलेली आहे अशी माहिती सरपंच मयुरी शिगवण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988