परभणी प्रकरण घडले आणि आंबेडकरी वस्त्यात पोलिसांच्या मानुसकिला काळीमा फासाणा-या क्रूरतेच चेहरा पुढे आला. कोबींग करत पोलिसांनी महिलांचे शारीरिक छळ करत अश्लील शिवीगाळ केली. लहान, तरूण, महिला, वयोवृद्ध कोणालाही पोलिसांनी सोडले नाही. सर्वांना सरसकट सोलून काढले. हालहाल करून, पळू पळू मारले.
हे सगळं घडल्यावर माझं विजय दादा वाकोडे सोबत फोनवर बोलणे झाले. मी विजय दादांना म्हणालो दादा मी परभणीला येऊ का? दादा म्हणाले, “राहूल बाळा तू ये… आपण मिळून ठरवूयात पुढे काय करायचं आणि पोलिसांच्या कारवाई विरोधात कसा लढा ऊभा करायचा.”
विजय दादा, सुधीर साळवे हे माझ्या सतत संपर्कात होते. मी दुसऱ्या दिवशी परभणीला गेलो. मी परभणीत गेलो. पहिल्यांदा जिल्हाधिकारी यांना भेटलो. नंतर कोर्टात गेलो, त्याठिकाणी वकील टीम सोबत भेटून चर्चा केली आणि नंतर विजय दादा यांना भेटायला गेलो. ते सरकारी रुग्णालयाबाहेर मिडीयाशी संवाद करत होते. मला हात करत बाजूला बोलावून घेतले. “बरं झालं तू आलास. आमचा नेता एस.एम. प्रधान आल्या सारखं वाटलं. तु बोल मिडीयाशी… मिडीयाला म्हणाले, राहूल प्रधानची मुलाखत घ्या. मग मी त्या संपूर्ण घटनेची क्रोनोलाॅजी मिडीयापुढे मांडली.
त्यानंतर आम्ही मिळून भिमराव हत्तीअंबीरे यांच्या आॅफीस येथे बैठक घेऊन पुढे कायदेशीर लढाई कशी लढायची, ही रणनिती ठरविली. त्यानंतर दुस-या दिवशी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. त्याचे पोस्टमार्टम ईन कॅमेरा आणि न्यायाधिशाच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे झाले पाहिजे. ही भूमिका विजयदादांनी ठेवली. त्यानुसार सोमनाथचे पोस्टमार्टन झाले. त्यानंतर काल सोमनाथचे पार्थिव परभणी येथे येईपर्यंत विजय दादा यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले.
निषेध आंदोलनाच्या आदल्या दिवशी रात्री मला फोन करून म्हणाले “राहूल बाळा, तु उद्या ये.” आणि मी काल निषेध आंदोलनात सहभागी झालो. माझं भाषणं ही झालं. माझ्या नंतर विजय दादांचे भाषण झालं. ते भाषणात म्हणाले की, “आपण मड्यावर राजकारण करणारे लोक नाहीत. सोमनाथ सुर्यवंशीचा आपण सन्मानाने अंत्य विधी करूयात. आपण वाघासारखं जगलं पाहिजे आणि वाघासारखं मेलं पाहिजे.” ही त्यांची शेवटची लाईन ठरली.
भाषणं संपल्यावर मला म्हणाले, “तु आज मुद्देसूद मांडलास. तुझ्या बोलण्यात आवेश होता, हमारे लिडर पॅंथर का बेटा हैं तू… आणि म्हणाले थोडं थकल्यासारखं वाटतंय. मी म्हणालो दादा दवाखाण्यात जाऊयात. ते म्हणाले “नाही रे, सगळं सोडून कसं जाऊ, हे सगळं आपल्याला शांतपणे पार पाडायचे आहे.
सोमनाथवर अंत्यसंस्कार सुरू होते, पण दादांना जास्त त्रास होत होता. एकीकडे सोमनाथ पेटत होता. तर दुसरीकडे परभणीचा नायक पडद्यामागे पडत होता.
सोमनाथ अमर रहे, अमर रहे म्हणत समाज स्मशानाची वाट सोडून घराकडे गेला. मात्र परभणीचा हा नायक दवाखाण्याकडे गेला. त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. दादांना रसाळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुधीर साळवे, पवन जोंधळे, सुधाकर ऊबाळे यांनी मला दिली. आम्ही लगेच रसाळ रुग्णालयात पोहोचलो. तो पर्यंत विजय दादा गेले होते. डाॅ.रसाळ हे दादांचे रेग्युलर डॉक्टर होते. डॉक्टरांशी फायनल चर्चा करून त्यानंतरच मी आॅफीशियली रात्री ९.४० वाजता जाहीर केले होते.
दादांचा मृत्यू हा नैसर्गिक असला तरी त्यांच्या या मृत्यूला जबाबदार परभणीचे पोलीस आहेत. परभणी पोलिसांनी त्यांना ही आरोपीच्या यादीत टाकले होते. ही हिंमत पोलिसांची झाली कशी? या सर्व घटना, हे धक्के आंबेडकरी समाजाने निट समजून ऊमजून घेत लढले पाहिजे.
परभणीची घटना घडली, त्या पहिल्या दिवसापासून विजय दादा हा पॅंथर मरण यातना सहन करत शेवट पर्यंत मैदानात होता. लढत लढत मैदानात प्राण सोडले पण, मैदान सोडले नाही. आपल्या चळवळीत वेळेवर येवून मैदान मारणारे भरपूर आहेत. त्यामुळे स्मृतिशेष पॅंथर विजय दादा वाकोडे यांच्या परिवाराला समाजाने आणि चळवळीने उघड्यावर पडू देऊ नये. त्यांच्या पाठीशी उभे रहा. हीच त्यांना आदरांजली ठरेल. जय भीम!
——————————————————
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988